जनचेतना/भंडारा/सतीश पटले
मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. त्यांनी २४ जुलै ला आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे. या मुळे आधीच विवंचनेत असलेल्या भाजपला पूर्व विदर्भात जबर धक्का बसला आहे. शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांनी २००४ मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. अत्यंत कमी वयात खासदार झालेले शिशुपाल पटले भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पोवार समाजाचा मोठा चेहरा मानले जातात.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा भाजपसाठी सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे, पाठपुरावा करीत होतो, मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्षनेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच तुमसर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नासाठी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले आहे.
धानाला उत्पादन खर्चावर आधारित किमान ३५०० रू. प्रतिक्विंटल भाव द्यावा, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिकाची नुकसान भरपाईची रक्कम देण्यात यावी, वीज बिलाचे दर कमी करण्यात यावे, बेरोजगारांची संख्या वाढत आहे त्यावर उाययोजना करण्यात यावी. निवडणुकीवर डोळा ठेऊन बेरोजगारांना फसवणारी लाडका भाऊ सारख्या योजनेत सुधारणा करावी. मुलींना मोफत उच्च शिक्षण संदर्भात राज्य शासनाने काढलेला जीआर पार फसवा आहे. यात खाजगी, स्वयं अर्थसहाय्यित व अभिमत विद्यापीठांना वगळले आहे. गोर-गरीब मुलींना पूर्ण शैक्षणिक शुल्क द्यावे लागणार आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे अर्ज निकाली काढावे, बावनथडी प्रकल्पग्रस्त असलेल्या १२ गावांना सिंचनाची सुविधा करण्यात यावी. धान खरेदी संस्थांचे प्रश्न मार्गी लावावे व १ नोव्हे.२३ ला मुंबई बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना घोषणा केल्याप्रमाणे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्यात यावी. हे सर्व प्रश्न राज्याच्या विधानसभा अधिवेशनात सोडवावे अन्यथा राजीनामा देण्याचा इशारा काही दिवसा पूर्वी शिशुपाल पटले यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला होता. जन सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले. ही बाब पक्ष नेत्यांच्या ध्यानात आणून दिली.पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे.
भाजप मध्ये लोकशाहीचा अस्त झाला. ज्यांनी भाजप ची स्थापना केली त्यांच्या विचारांना आताच्या नेत्यांनी तिलांजली दिली. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातील भाजपा आता राहिली नाही. खऱ्या कार्यकर्त्यांचा विसर भाजपला पडू लागला आहे. कर्मठ सामान्य कार्यकर्त्याची किंमत पक्षाला राहिली नाही. सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात राहून न्याय देता येत नसेल. तर पक्षात राहून काय उपयोग? अशी खंत शिशुपाल पटले यांनी व्यक्त केली. यामुळे अतिशय दुःखी अंत:करणाने आपण पक्षाच्या सर्व पदांचा व भाजपच्या प्राथमिक सदयत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी सांगितले.