जनचेतना/देश/सचिन बोपचे
देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सत्ताधाऱ्यांसर विरोधकही निवडणूक प्रचाराला लागले आहेत. यादरम्यान केंद्र सरकराने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरांच्या मजुरीत ३ ते १० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे मनरेगा मजूरांना पूर्वीपेक्षा जास्त मजुरी मिळणार आहेत. गुरुवारी (ता. २८) सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. मात्र, ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
या नव्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील मजुरांच्या मजुरीत २४ रूपयांहून अधिकची वाढ होणार आहे. तर गोव्यातील मजुरांच्या मजुरीत सर्वाधिक ३४ रुपयांची वाढ झाली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरीतील ही वाढ प्रचलित दराच्या (NREGS) १०.५६ टक्के आहे. तर सर्वाधिक कमी वाढ उत्तराखंडमधील मजुरीत झाली आहे.
राज्यनिहाय वेगळी मजुरी
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने शेकऱ्यांसह सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक घोषणा केल्या होत्या. यापाठोपाठ आता मजुरांना खुश करण्यासाठी मोदी सरकारने घोषणा केली आहे. सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) अंतर्गत येणाऱ्या मजुरांच्या मजुरीत वाढ केली आहे. यामुळे या योजनेतंर्गत काम करणाऱ्या मजुरांना जास्त वेतन मिळणार आहे.
मनरेगाचे बजेट
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मनरेगाच्या निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. तसेच मनरेगासाठी निधीची तरतूद २०२३-२४ या आर्थिक वर्षात अंदाजे ६० हजार कोटी रुपये इतकी होती. जी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ८६ हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निधीत २६ हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे.
कोणत्या राज्यात किती मजुरी?
मनरेगाच्या मजुरीत वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. यानंतर सर्वाधिक वाढ ही गोव्यात झाली असून येथे मजुरीत ३४ रूपये वाढ करण्यात आली आहे. गोव्यात या आधी ३२२ रुपये प्रतिदिन मजुरी मिळत होती. ती आता वाढून ३५६ रुपये झाली आहे. तर तर सर्वात कमी मजुरी उत्तराखंडमध्ये दिली जाणार असून येथे ३.०४ टक्के वाढ झाली आहे. येथे फक्त ७ रूपये वाढ झाली आहे. येथे आधी २३० रुपये मजुरी दिली जात असे ती आता २३७ रुपये प्रतिदिन असेल. म्हणजेच गोवा आणि उत्तराखंडमधील मजुरीत ११९ रूपयांचा फरक आहे.
महाराष्ट्रात २४ रूपये वाढ
याआधीही मनरेगा मजुरांच्या मजुरीत २६ रूपयांनी वाढविण्यात आली होती. यानंतर आता २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २४ रूपयांची वाढ करण्यात आली असून आता कामगारांना प्रति दिवशी २९७ रूपये मजुरी मिळणार आहे. तर याच्याआधी २७३ रूपये मजुरी मिळत होती.
योजनेचे उद्दिष्ट आणि नोंदणी
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जानेवारी २०२४ पर्यंत, मनरेगामध्ये १४.२८ कोटी कामगारांची नोंद आहे. तर मनरेगा योजनेचे उद्दिष्ट देशातील ग्रामीण भागातील कुटुंबांच्या उपजीविकेच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान १०० दिवस हमी मजुरीचा रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे.