जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
देशातील गोंड आदिवासींचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड देवस्थान धनेगांव ता.सालेकसा जि.गोंदिया या तिर्थस्थानाला तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत “अ” तिर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले हे अनेक दिवसांपासून प्रयत्नशील असुन यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 4 जुलै रोजी मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले.व सविस्तर चर्चा केली.
त्यावर मान.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ 8 जुलै रोजी प्रधान सचिव ग्रामविकास मंत्रालय यांना पत्र पाठवून त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.त्यामुळे कचारगड देवस्थान धनेगाव ला “अ” वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात पर्यटनस्थळासोबतच मोठमोठी धार्मिक स्थळेही आहेत. जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थान धनेगाव हे देशातील गोंड आदिवासींचे महाकाली कंकाली पारि कुपार लिंगो हे फार मोठे पुरातन श्रध्दास्थान आहे.या ठिकाणी फेब्रुवारी – मार्च महिण्याचे दरम्यान माघ पोर्णिमेनिमीत्य मोठी यात्रा भरते.देशभरातील लाखो आदिवासी बांधव या तिर्थस्थानाला भेट देवुन आपल्या आराध्य दैवतांची पुजा अर्चा करुन आपली मनोकामणा पुर्ण करतात.अशा या पुरातन तिर्थक्षेत्राला अ तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी मंदीर कमिटीची व भावीकभक्तांची मागणी होती.या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ.कादंबरी बलकवडे यांनी 2 ऑगष्ट 2019 ला उपसचिव ग्राम विकास विभागाला प्रस्ताव तयार केला होता.
याबाबत कचारगड देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी अलीकडेच माजी मंत्री राजकुमार बडोले यांना लेखी निवेदन देवुन चर्चा केली होती. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेता माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी 4 जुलै 2024 ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन कचारगड देवस्थान धनेगावला अ तिर्थक्षेत्राचा दर्जा देणे बाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 जुलै 2024 ला प्रधान सचिव ग्राम विकास यांना कारवाई करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली कसे काढण्यात येईल असे निर्देश दिले. त्यामुळे कचारगड देवस्थान धनेगावला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.