जनचेतना/गोंदिया
मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आल्याने फुके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
गोंदिया. नुकतेच 11 मार्च रोजी म.रा. गाव कामगार पोलीस पाटील संघ, गोंदिया जिल्हा तर्फे पोलीस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, मेळावा व ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन डॉ.आंबेडकर भवन, क्रीडा संकुल रोड, मरारटोली गोंदिया येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री श्री.फुके यांनी पोलीस पाटील भवन बांधण्यासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या संघटनेला प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली तसेच लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासनही दिले होते.
डॉ. फुके यांनी गोंदिया ते लाखनी येथे निवास स्थानी जात असतांना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पोलीस पाटलांच्या रास्त मागण्यांची माहिती दिली व मानधनात वाढ करण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.परिणय फुके यांची ही मागणी सकारात्मकतेने घेत मानधन 6500 रुपयांवरून 15 हजार रुपये करण्यास सहमती दर्शवली. आणि दिलेले शब्द पाळत आज (13 मार्च) मुंबई मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस पाटलांच्या मानधनात 8500 रुपयांनी वाढ करून 15 हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे 2019 पूर्वी पोलीस पाटलांच्या मानधन केवळ 3000 रुपये होते. सन 2019 मध्ये पोलीस पाटील संघटनेने गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.
श्री.फुके यांनी त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली असता त्यांनी पोलीस पाटलांचे मानधन 3,000 रुपयांवरून 6,500 रुपये करण्याचे काम केले. आता पुन्हा पाच वर्षांनंतर मानधनात वाढ करण्याची मागणी जोर धरत असताना डॉ.फुके यांनी ती पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन पोलीस पाटलांना मोठा दिलासा दिला आहे. मानधनात पुन्हा एकदा दुप्पटनी जास्त वाढ करून 15 हजार रुपये करण्याचा शासन निर्णय जारी केल्याबद्दल म.रा. गाव कामगार पोलीस पाटील संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करून आनंद व्यक्त केला. .