गावाच्या विकासासाठी सरपंच प्रशिक्षण गरजेचे : जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले

Spread the love

जनचेतना/गोंदिया/आरती पारधी

अधिकारी, कर्मचारी नेहमी प्रशिक्षण घेतात. त्यामुळे ते उत्तम प्रशासन चालवितात. त्याचप्रमाणे गावातील सरपंचानी सुध्दा प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रशिक्षित सरपंच गावाचा सर्वांगिण विकास साधू शकत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष  पंकज रहांगडाले यांनी केले.

न्यू ग्रिनलँड लॉन येथे (ता. 1) जिल्हास्तरीय सरपंच मेळावा पार पडला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  एम. मुरूगानंथम, अर्थ व बांधकाम समिती सभापती योपेंद्रसिंह टेंभरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता संजय पुराम, समाज कल्याण समिती सभापती पूजा अखिलेश सेठ, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, सालेकसा पंचायत समितीच्या सभापती प्रमिला गणवीर, देवरी पंचायत समितीच्या सभापती अंबिका बंजार, जिल्हा परिषद लायकराम भेंडारकर, सुरेश हर्षे,आनंदा वाढीवा, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती उषाताई मेंढे, अंजली अटरे, जगदीश बावनथडे,प्रविण पटले,विजय उईके,रितेशकुमार मलघाम,वंदना काळे,हनवंत वट्टी,राधिका धरमगुडे,चर्तूभूज बिसेन,उषाताई शहारे,लक्ष्मी तरोणे,कविता रंगारी,विमलताई कटरे,अश्वीनी पटले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यावेळी उपस्थित होते. ग्रामसेवकांना गावातील इत्थंभूत माहिती असावी, यावर भर देत गावांच्या विकासासाठी मिशन मोड मध्ये कार्य करण्याची गरज मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यानी व्यक्त केली. ग्रामपंचायत संघटना कच्छ गुजरातचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश चंगा आणि आदर्श ग्रामसंसद मिझापूर नेरी जिल्हा वर्धाचे सरपंच बाळाभाऊ सोनटक्के यांनी आपल्या मार्गदर्शनातून ग्रामविकासाची सविस्तर माहिती दिली. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलरथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. कार्यक्रमाचे प्राप्ताविक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोंविद खामकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे आणि माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले.

भजेपार ठरली जिल्हास्तरीय ‘स्मार्टग्राम’

आर.आर. (आबा) पाटील सुंदर ग्रामपंचायतींचा याप्रसंगी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सालेकसा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत भजेपारला तालुका व जिल्हास्तरीय स्मार्टग्रामचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत इर्री, तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत मुंडीकोटा, आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत तिगाव, गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोहगाव बु., सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत डव्वा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत धाबेटेकडी, देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत मेहताखेडा यांना तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. सर्व ग्रामपंचायतींचा शाल, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींला 40 लक्ष तर तालुकास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 लक्ष रूपयांचा पारितोषिक मिळणार आहे.

तीन ग्रामपंचायतींना माझी वसूंधरा पुरस्कार

माझी वसुंधरा योजनेत गोंदिया तालुक्यातील कारंजा, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, तिरोडा तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचातींनी विभागस्तरावर प्रथम पुरस्कार पटकाविला. या तिन्ही ग्रामपंचायतींना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. कारंजा व सौंदड या ग्रामपंचायतींनी 75 लक्ष रुपयांचा तर वडेगाव ग्रामपंचायतींने 50 लक्ष रुपयांचा पुरस्कार पटकाविला आहे.