मित्रांसोबत नाल्याकडे फिरायला गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा पाय घसरून बुडाल्याची घटना

Spread the love

जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके

मित्रांसोबत नाल्याकडे फिरायला गेलेल्या एका बारा वर्षीय मुलाचा पाय घसरून तो बुडाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता गौरनगर येथे घडली. या घटनेची कुठेही वाच्यता झाली नसल्याने अद्याप शोध लागू शकला नाही. बुडालेल्या मुलाचे नाव राजीव अनंत अधिकारी असे आहे. रविवारी पाण्यात बुडाल्याची ही दुसरी घटना आहे. पिंपळगाव खांबी येथे रजनीश वामन शिवणकर (वय १० ) हा मुरुम खाणीच्या खड्ड्यात बुडाल्याची घटना रविवारी घडली होती.

राजीव हा रविवारी मित्रांसोबत गेला होता. तो नाल्यात पडला. नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याला अधिक प्रवाह असल्याने तो वाहून गेला. त्याचे मित्र घरी परतले. मात्र त्यांनी घरी कुणालाच सांगितले नाही. सोमवारी ही बाब उघडकीस आली. येथील तहसीलदार अनिरुद्ध कांबळे हे दुपारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शोध कार्य आरंभला. सुमारे ३०० मीटर पर्यंत नाल्यात सरळ बोट गेली मात्र नाल्यात अधिक पाणी व पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने शोध लागू शकला नाही. राजीवची आई त्याला सोडून गेली आहे. वडील तेवढे गंभीर नाहीत. कालपासून तो घरी आला नसताना कुठेही हरविल्याची नोंद नाही.

गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात भरपूर पाऊस झाला. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात तो लांबवर गेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वडसा तालुका प्रशासनाला याची सूचना देण्यात आली आहे. ते सुद्धा संपर्कात आहेत. मंगळवारी सकाळी गोंदिया वरून शोध मोहिमेसाठी चमू येणार असल्याची माहिती तहसीलदार कांबळे यांनी दिली.