धानाच्या चुकाराचे पैसे सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ; माजी खा. सुनिल मेंढे यांच्या पाठपुराव्याचे फलित

Spread the love

जनचेतना/भंडारा/तुषार पशीने

रब्बी हंगाम 2024 मधील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरून धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या चुकाराचे पैसे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले असून, 15 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार असल्याची माहिती माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिली.

रब्बी हंगामात उत्पादित धानाच्या विक्रीसाठी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्राच्या माध्यमातून खरेदी केल्या गेलेल्या धानाचे मागील काही दिवसापासून चुकारे बाकी होते. ही रक्कम कोट्यावधीची होती. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळावे म्हणून माजी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश येऊन काही दिवसांपूर्वी हे पैसे फेडरेशनच्या मुख्यालयाकडे प्राप्त झाले होते. दरम्यान त्यांनी हा निधी वळता करून आता जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे.

भंडारा जिल्ह्यासाठी 23 जून पर्यंत देय असलेले 37 कोटी रुपये तर गोंदिया जिल्ह्यासाठी 20 जून पर्यंत देयअसलेले 65 कोटी रुपये जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. जमा झालेला हा निधी सोमवार 15 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला जाणार असल्याची माहिती मा. सुनील मेंढे यांनी दिली. शनिवार आणि रविवार सुट्टी आल्याने सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी करून नव्या जोमाने शेती कामाला लागावे, असेही सुनील मेंढे यांनी सांगितले.