अन् थेट ग्रामसेवकांशी बोलून पाणीटंचाईच्या समस्येवर काढला तोडगा

Spread the love

आंबेतलाव येथील महिलांनी सांगितली पाणीटंचाईची समस्या

जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके

नागरिकांच्या विविध समस्या जाणून त्याला न्याय देण्यासाठी शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मैदानात उतरली असून ३१ मे रोजी अर्जूनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आंबेतलाव या गावाला भेट दिली असता महिलांनी पाणीटंचाईची समस्या मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी थेट ग्रामसेवकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधित पाणीटंचाईवर तोडगा काढला.

सविस्तर असे की, आंबेतलाव हे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जवळपास २ हजार २००० लोकसंख्या असलेले गाव. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून गावात सार्वजनिक विहिरी व हातपंप आहेत मात्र सध्या उन्हाळ्यात उष्णतेने उच्चांक गाठला असताना पाण्याची पातळी अधिक खोलवर पोहोचली आहे. त्यामुळे सार्वजनिक विहिरी व हातपंपातून पाणी येत नाहीत.तथापि, ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम दौऱ्यावर असताना येथील महिलांनी पाणीटंचाईची समस्या त्यांना सांगितली. महिलांसह नागरिकांनी पाणीटंचाईची समस्या सांगताच मिथुन मेश्राम यांनी तात्काळ आंबेतलाव येथील ग्रामसेवक रीना राऊत यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची तात्काळ सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. यावर ग्रामसेवक राऊत यांनी पुढील आठवडाभरात गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याची हमी दिली.

दरम्यान, वारंवार लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्यांबद्दल सांगून देखील या समस्येकडे हेतूपूरस्पर दुर्लक्ष केले जात होते. मात्र राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी समस्या ऐकून तात्काळ अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून येत्या काही दिवसांत पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची हमी दिल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.