जनचेतना/गोंदिया/आरती पारधी
पीक कर्ज हंगाम सन २०२३-२४ चे पीक कर्जाची परतफेड मुदत कालावधीत म्हणजे ३१ मार्च २०२४ पर्यंत भरणाऱ्या शेतकऱ्यांना 0 टक्के व्याजदराने सवलत देण्याचे शासनाचे धोरण असताना सेवा सहकारी संस्थांनी ६ टक्के व्याजदराने मुद्दल रक्कम जमा करण्याचे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने निर्देश दिले आहे. हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता याबाबत फेरनिर्णय व्हावा व शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची कोणतीही व्याजाची रक्कम वसूल करण्यात येऊ नये. तसेच 0 टक्के व्याज दराने मुदत कालावधीत मुद्दल पीक कर्जाची रक्कम घेण्यात यावी, अशी मागणी काँगेस चे गोंदिया विधानसभा निरीक्षक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजकुमार (पप्पुभाऊ) पटले यांनी केली आहे.
यापूर्वी खरीप पिक कर्ज हंगाम २०२३-२४ चे पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदाला केंद्र शासन ३ टक्के व डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत ३ टक्के व्याज सवलत वजा जाता ३ लक्ष पीक कर्ज रकमेपर्यंत शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ कर्ज वसुलीचे वेळेस देणेबाबत कळविण्यात आले होते. परंतु १३ फेब्रुवारी २०२४ ला सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांनी दूरचित्रवाणी द्वारे घेतलेल्या परिषदेमध्ये सहकार आयुक्त कार्यालयाकडून खरीप हंगाम सन २०२२-२३ चे मुदतीत करण्यात आलेल्या कर्ज परतफेडीचे निकषावर केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या ३ टक्के व्याज परताव्याचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या फसल रिन पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश प्राप्त झाले असून सन २०२३-२४ पासून कर्ज परतफेडीच्या निकषावर प्राप्त होणाऱ्या ३ टक्के केंद्रशासन व डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या सवलतीचे ३ टक्के व्याज परताव्याची रक्कम डीबीटी द्वारे मुदतीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचत ठेव खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी व विविध कार्यकारी संस्थांनी सन २०२३-२४ चे पीक कर्ज मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना 0 टक्के व्याज सवलतीचा लाभ न देता शेतकऱ्यांकडून मुद्दल रकमेसह ६ टक्के व्याज दराने व्याजाची रक्कम वकुल करावी. असे न केल्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था होणाऱ्या नुकसानी स्वतः जबाबदार राहतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सदर परिपत्रक जारी होण्यापूर्वी सन २०२३-२४ चे हंगामाची पीक कर्ज वसुली फक्त मुद्दल रकमेची भरली आहे.
अशा सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत वाटप होणाऱ्या शेतकऱ्यांकडून पुढील हंगामात सन २०२४-२५ चे कर्ज मंजूर करण्यापूर्वी प्रचलित ६ टक्के दराने आकारलेल्या व्याजाची वसुली करण्यात यावी व्याजासकट मुद्दल रकमेची वसुली भरल्याशिवाय शेतकऱ्यांचे कर्ज खाते निरंक होणार नाही. असेही या परिपत्रकातून कळविले आहे. पीक कर्ज हंगाम सन २०२३-२४ चे पीक कर्जाची परतफेड मुदत कालावधी म्हणजे ३१ मार्च २०२४ पर्यंत भरणाऱ्या शेतकऱ्यांना ० टक्के व्याज सवलत देण्याचे शासनाचे धोरण असताना सेवा सहकारी संस्थांनी ६ टक्के व्याजदराने मुद्दल रक्कम जमा करण्याचे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने निर्देश दिले असून ते अन्यायकारक आहे .तरी याबाबत त्वरित फेर निर्णय व्हावा व शेतकऱ्यांकडून कोणतीही व्याजाची रक्कम वसूल करण्यात येऊ नये अशी मागणी ही काँग्रेस चे गोंदिया विधानसभा निरीक्षक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजकुमार (पप्पू) पटले यांनी केली आहे .