जनचेतना/तिरोड़ा/पोमेश रहांगडाले
तिरोडा तालुक्यातील ग्राम भजेपार येथे गोठ्याला आग लागून गोठ्यातील शेतीपयोगी अवजारे व गोठ्याला लागून असलेल्या किराणा दुकानातील संपूर्ण समान जळून राख झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर असे की दिनांक 13 जूनला रात्री पावणे अकरा वाजता दरम्यान भजेपार येथील माजी सरपंच भूमेश्वरीताई खडकसिंगजी अंबुले यांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीमध्ये त्यांच्या गोठ्यात ठेवलेला जनावरांचा चारा व शेतीपयोगी अवजारे नांगर, वखर, दतार, बैलबंडी सर्व तसेच गोठ्याला लागून असलेल्या किराणा दुकान मधील संपूर्ण सामान जळून राख झाला.
शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग लागल्याचा अंदाज आहे. आग लागल्याचे कळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले नगरपरिषद तिरोडा व अदानी येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. जवळपास दोन तास चाललेल्या या अग्नि तांडवात अंबुले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतीच्या मशागतीचे उपयोगी साहित्य व किराणा दुकानातील सामान जळून राख झाले आहे. त्यात अंबुले यांचे जवळपास सहा लाखांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.